2026-01-03

मेनोपॉज च्या उंबरठ्यावर... भाग १ पुरुषांसाठी एक खास 'हितगुज'

मेनोपॉज च्या उंबरठ्यावर... भाग १ पुरुषांसाठी एक खास 'हितगुज'

हा ब्लॉग अशा पुरुषांसाठी, ज्यांच्या आयुष्यात आई, पत्नी, बहीण, मैत्रिण किंवा सहकारी अशा विविध रूपांत स्त्रिया आहेत. जेव्हा एखादी स्त्री चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचते, तेव्हा तिचं शरीर आणि मन एका 'अद्भुत चक्रातून' जात असतं. हे चक्र जितकं शारीरिक आहे, तितकंच ते मानसिकही आहे. ती अचानक चिडचिड करते, जेव्हा तिला विनाकारण घाम फुटतो किंवा जेव्हा ती कामात थोडी मंदावते...

 

ही वेळ तिची थट्टा करण्याची किंवा तिला 'चिडचिडी' म्हणून लेबल लावण्याची नाही, तेव्हा तिला तुमच्या 'सल्ल्याची' नाही, तर तुमच्या 'साक्षीभावाची' आणि थोड्या 'समजूतदारपणाची' गरज असते. तिला कदाचित स्वतःच्या वेदना, त्रास शब्दांत मांडता येत नसतील, पण तिला तुमची साथ हवी असते.
हे चक्र नेमकं काय आहे आणि तुम्ही त्यात तिला कशी साथ देऊ शकता, हे समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

अनेकांचा असा एक समज असतो की, मेनोपॉज म्हणजे एखादी तारीख, ज्या दिवशी पाळी अचानक थांबते आणि विषय संपतो. पण तसं नसतं. हा काही महिने नाही, तर काही वर्षं चालणारा एक 'प्रवास' आहे. कधी पाळी लवकर येते, कधी लांबते, तर कधी शरीरात उष्णतेच्या अशा लाटा (Hot Flashes) उठतात , कधी भर थंडीतही जीव कासावीस होतो. रात्रीची झोप बिघडते, अंथरुणातून उठावसं वाटत नाही, वजन वाढतं, चिडचिड होते, अचानक सारखं रडू येत, शरीरात थकवा जाणवतो.

आरशात बघताना तिला स्वतःचं शरीर अनोळखी वाटू लागतं. "मी आता म्हातारी झाले का?" हा प्रश्न तिला सतत सतावत असतो. Hormonal imbalances मोठ्या वादळातून ती जात असते. लक्षात घ्या हे शरीराचं ऋतूचक्र बदलताना होणारी तगमग आहे, हे आपण आधी समजून घ्यायला हवं.जेव्हा ती म्हणते की "मला अस्वस्थ वाटतंय", तेव्हा ते खरं असतं. आणि हा बदल समजून घेणं हीच तुमच्याकडून तिला अपेक्षित असलेली पहिली मदत आहे.

 

 

बदलती कुटुंब व्यवस्था आणि 'ती'ची एकटेपणाची लढाई

पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत स्त्रियांना एक 'सपोर्ट सिस्टीम' होती. घरातल्या वयस्कर स्त्रिया, नणंदा-जावा या बदलांमधून गेलेल्या असायच्या, त्यामुळे तिला "हे सगळं नॉर्मल आहे" असं सांगणारं कुणीतरी असायचं. कामाची विभागणी व्हायची आणि तिला विसावा मिळायचा.

 

 

‘सँडविच' अवस्था - घर आणि जबाबदाऱ्यांचा डोंगर

 

या वयात स्त्री एका अर्थाने 'सँडविच' झालेली असते.
आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत (Nuclear Families) स्त्री एकटी पडली आहे. ऑफिसचं काम, घरचं नियोजन, एकीकडे मुलांचं higher education, करिअर, त्यांची लग्नं किंवा त्यांचे हट्ट; तर दुसरीकडे वृद्ध सासू-सासऱ्यांची, आई - वडिलांची ढासळती प्रकृती. या दोन्ही - तिन्ही आघाड्यांवर लढताना तिला स्वतःच्या मेनोपॉजच्या त्रासाकडे, शरीरातल्या बदलांकडे बघायला वेळच नसतो. आजच्या काळात तिला स्वतःसाठी 'स्पेस' शोधणं कठीण झालं आहे. मग हा बदल जेव्हा उग्र रूप धारण करतो, तेव्हा ती गोंधळून जाते.

 

अशा वेळी तिला "आई, तू आजकाल खूपच चिडतेस" किंवा "तुला नेहमीच काहीतरी त्रास असतो" असं म्हणून तोडून बोलण्यापेक्षा, तिला म्हणा— "आज तू थोडा वेळ शांत बस, मी तुला चहा करून देतो." किंवा नवऱ्याने म्हणावं, "तू नको काळजी करु, मी आहे ना तुझ्या सोबतीला, होईल सगळं व्यवस्थित, तू जरा आराम कर." तिचा हा प्रदीर्घ प्रवास सुसह्य करणं तुमच्या हातात आहे.

 

ऑफिस डेस्क आणि 'तरुण' स्पर्धेची भीती

 

अनेकदा मित्रमंडळीत किंवा ऑफिसमध्ये 'PMS' (Premenstrual Syndrome) किंवा मेनोपॉजवर थट्टा केली जाते. "ती सारखं विसरते" , "हिचं वय झालंय" किंवा "हल्ली हिला काहीच झेपत नाही" असं म्हणून आपण नकळत तिला मानसिकरित्या दुखावतो.

 

चाळीशीतील स्त्री जेव्हा ऑफिसमध्ये काम करते, तेव्हा तिला तरुण पिढीकडून मिळणाऱ्या स्पर्धेची एक सुप्त भीती असते. ऑफिसमध्ये गेल्यावरहि तिचा संघर्ष संपत नाही. तिथे नवीन तंत्रज्ञान घेऊन येणारी २०-२२ वर्षांची मुलं बघून तिला 'Insecurity' जाणवू लागते. "माझं प्रमोशन थांबेल का?", "मला आता हे झेपत नाहीये का?", "मी मागे पडले आहे का?" हे विचार तिला ग्रासतात.

 

ऑफिसमधील पुरुष सहकाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तिच्याकडे जो 'विवेक' आणि 'अनुभव' आहे, तो कोणत्याही कोडींगपेक्षा आणि नवीन तंत्रज्ञानापेक्षा मौल्यवान आहे. जर तुमची महिला सहकारी आज थोडी शांत असेल किंवा तिची चिडचिड होत असेल, तर तिला जज करण्याऐवजी तिच्या अनुभवाचा आदर करणं, तिला थोडं समजून घेणं हे खरं 'मैत्र' आहे. तुमच्यातील हा मैत्रभाव तिला तिचं करिअर टिकवून ठेवण्यास मोठी ताकद देईल.

 

 

समवयस्क मैत्री म्हणजे एक 'सेफ्टी नेट' च एक भक्कम कवच : गप्पांच्या पलीकडचं नातं.

 

या वयात मैत्री केवळ चहा-कॉफीपुरती मर्यादित नसते. या वयातील मैत्री म्हणजे फक्त हास्य-विनोद नव्हे, तर एकमेकांच्या मौनाला समजून घेणं. चाळीशीतील मैत्रीत आता थोडी प्रगल्भता हवी. तुमचे समवयस्क मित्र-मैत्रिणी हे तुमच्या आयुष्यातील 'आरसे' असतात.
मेनोपॉजच्या काळात स्त्रीला अशा एका जागेची (Space) गरज असते, जिथे ती 'तिच्यासारखी' वागू शकेल.

 

तिला Sympathy ची नाही, तर समजून घेण्याची (Empathy) गरज आहे. "आम्ही तुझ्या सोबत आहोत," हा विश्वास तिला एकटी पडण्यापासून वाचवू शकतो. मैत्रीतला हा आधार तिला या बदलांचा स्वीकार करण्यास मानसिक बळ देतो.

 

 

"कधी विनाकारण चिडचिड होईल, कधी डोळ्यांत येईल पाणी, शरीरातल्या बदलांची ही, सुरू आहे एक अनोखी कहाणी... तुम्ही बना तिचे 'साक्षीदार', द्या तिला थोडा हक्काचा विसावा, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करणे, हाच नात्यातला खरा दुवा!"

 

 

हे नक्की करुन बघा :

 

१. साक्षीदार बना: जेव्हा ती चिडचिड करते, तेव्हा तिला प्रतिवाद न करता फक्त तिचं ऐकून घ्या. तुमचं शांत राहणं तिला शांत करेल.

 

२. छोट्या कृती, मोठा बदल: तिला न सांगता घराची एखादी जबाबदारी स्वतःहून पार पाडा आणि फक्त शांतपणे तिच्या शेजारी बसा. तुमचं तिथे असणंच तिला ताकद देईल.

 

३. छोटीशी मदत : ऑफिसमध्ये 'ती' अस्वस्थ असेल, तर तिला "काही मदत करु का?" विचारा.

 

४. No Judgement Zone: मित्रांनो, आपापल्या शाळा कॉलेजच्या WhatsApp ग्रुपमध्ये असा एक नियम करून बघा, " इथे कोणाच्याही मूड स्विंग्सची थट्टा होणार नाही."

 

 

या छोट्या गोष्टी तिला "मी एकटी नाहीये", "होईल सगळं व्यवस्थित" हा विश्वास देतात.

 

 

स्त्रीचं शरीर आणि मन जेव्हा या बदलांतून जात असतं, तेव्हा तुम्ही दिलेला आधार हा कोणत्याही औषधापेक्षा मोठा असतो. तुम्ही जर या प्रवासात तिचे 'साक्षीदार' बनलात, तर तुमचं घर आणि ऑफिस अधिक सुसंवादी होईल. शरीराचा बदल निसर्गाचा नियम आहे, पण त्या बदलात साथ देणं हे माणुसकीचं नातं आहे!

 

 

एक प्रश्न: तुम्ही तुमच्या घरातील स्त्रीला किंवा ऑफिसमधील स्त्री सहकाऱ्याला, समवयस्क मैत्रिणीला अशा वेळी कशी मदत केली , करता किंवा कराल ? इ-मले द्वारे नक्की कळवा.

 

 

पुढील ब्लॉग (भाग २) मध्ये आपण पाहणार आहोत, स्त्रियांनी या काळात स्वतःच्या मनावर काम (Self-Acceptance) कसं करावं आणि 'स्वयं-संवाद' कसा साधावा.

 

 


 

© श्रीपल्लवी वैष्णव –
होलिस्टिक वेलनेस कन्स्लटंट आणि तुमची सखी
hi@shripallavi.com

Ready for your own mental detox?

Join the program today and start your journey.

Get in Touch