2026-01-01

मनाचे सॉफ्टवेअर अपडेट!

मनाचे सॉफ्टवेअर अपडेट!

आपल्याकडे एक म्हण आहे, "ज्याचं जळतं, त्यालाच कळतं." पण आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक वेळी स्वतःच 'जळून' अनुभव घेणं आपल्याला(सर्वार्थाने) परवडणारं आहे का? आजचा शहाणा (smart) माणूस तो आहे, जो स्वतः ठेच लागण्याआधीच इतरांच्या अनुभवातून शिकत जातो आणि कृती करतो. साधं उदाहरण पहा, आपण कोणतीही महागडी वस्तू घेतली की त्यासोबत एक 'User Manual' मिळतं. का? कारण ती वस्तू कशी वापरावी आणि ती खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी (Preventive Care), हे त्यात लिहिलेलं असतं.

 

 

आपण आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी अशाच 'प्रिव्हेंटिव्ह' तज्ज्ञांचा विचार करतो:

आरोग्याचा इन्शुरन्स: आपण आजारी पडण्याची वाट पाहत नाही, तर आधीच स्वतःला सुरक्षित करतो.

गाडीची सर्व्हिसिंग: इंजिन बंद पडू नये म्हणून आपण आधीच ऑईल बदलतो, सर्व्हिसिंग करतो.

आर्किटेक्टचा सल्ला: घर बांधताना भिंती कोसळू नयेत म्हणून आपण आधीच स्ट्रक्चरल प्लॅन करतो.

 

पण आपल्या 'मनाचं' काय?

 

मनाला नैराश्याचा (Depression) किंवा अस्वस्थतेचा गंज (junk) लागू नये म्हणून आपण कोणतं 'लाइफ मॅन्युअल' वाचतो? आपण मन कोलमडण्याची वाट पाहतो आणि मग डॉक्टरांकडे धावतो. पण जर आपल्याला आधीच असं काही मिळालं ज्याने मनाची 'रोगप्रतिकारशक्ती' (Mental Immunity) वाढली, तर?

इथेच भारतीय प्राचीन ग्रंथ एका 'तज्ज्ञ consultant' ची भूमिका बजावतात. हे ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या अशा 'केस स्टडीज'चं संकलन आहेत, ज्या आपल्याला 'मेंटल बॅकअप' देतात. म्हणजे समस्या आल्यावर (software corrupt झाल्यावर) काय करायचं यापेक्षा, समस्या आली तरी मन 'हँग' होऊ नये, मानाचं software corrupt होऊ नये यासाठीची पूर्वतयारी (मनाचे 'सॉफ्टवेअर अपडेट') म्हणजे हे ग्रंथ.

 

 

दैनंदिन जीवनात ग्रंथ का वाचावे? (Why read daily?)

जसा आपला आहार रोजचा असतो, तसाच मनाचा आहार रोजचा असायला हवा. ग्रंथ वाचन का गरजेचे आहे, याची काही महत्त्वाची कारणे:

 

 

१. ही 'केस स्टडीज'ची खाण आहे (A Treasury of Case Studies): आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यातली समस्या नवीन आहे. पण या ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या अशाच 'केस स्टडीज' मांडल्या आहेत. अर्जुनाचा निर्णय घेण्याचा गोंधळ असो किंवा धृतराष्ट्राचा मोह—या सर्व मानवी स्वभावधर्माच्या कथा आहेत. त्या वाचल्या की आपल्याला समजतं, "हे फक्त माझ्याच बाबतीत घडत नाहीये" आणि आपोआप मनावरचं ओझं हलकं होतं.

 

२. Neutral Advice: मित्र किंवा नातेवाईक अनेकदा आपल्याला सल्ला देतात, ज्यात पूर्वग्रह असू शकतो. पण ग्रंथ हे 'Neutral असतात. ते तुम्हाला आरसा दाखवतात. (याचा अर्थ तुम्ही कोणाचा सल्ला घेऊ नये किंवा समुपदेशकाची मदत घेऊ नये असं अजिबातच नाही)

 

३. भगवद्गीता: तुम्हाला कडू पण सत्य असा 'रिअ‍ॅलिटी चेक' देते.

 

४. दासबोध: तुम्हाला 'प्रॅक्टिकल सोल्यूशन्स' देतो.

 

५. मनाचं सॅनिटायझर: जसं आपण हाताला जर्म्स अर्थात जंतू लागू नयेत म्हणून सॅनिटायझर वापरतो आणि hygiene maintain करतो , तसं मनाला नकारात्मक विचारांचे जर्म्स लागू नयेत म्हणून रोज केलेलं वाचन किंवा चिंतन म्हणजे Mental hygiene. रोज ग्रंथ वाचल्याने मनावर नकारात्मकतेचे जर्म्स लागत नाही. हे ग्रंथ म्हणजे मनाचं 'सॅनिटायझर' आहे, जे रोजच्या व्यवहारातील वैचारिक जंतून (कीड) पासून संरक्षण करतं.

 

 

६. Decision Making मध्ये स्पष्टता: व्यवसायात किंवा कुटुंबात मोठे निर्णय घेताना मन द्विधा मनस्थितीत असतं. अशा वेळी ग्रंथांमधील तत्वज्ञान आपल्याला Core Values ची आठवण करून देतं. त्यामुळे निर्णय घेणं सोपं जातं.

 

 

शारीरिक आजारासाठी आपण डॉक्टरकडे जातो, पण आपण आजारी पडूच नये म्हणून काय काय करतो? तर आपण आहारतज्ज्ञाचा सल्ला घेतो किंवा जिम, योगा क्लास लावतो. भविष्यात पैशांची चणचण भासू नये म्हणून आपण CA कडे जाऊन आधीच गुंतवणूक करतो. तसंच, मन नैराश्या(Depression) किंवा काळजीत (Anxiety) बुडू नये म्हणून आधीच मनाला भक्कम करणं, म्हणजे 'मनाची रोगप्रतिकारशक्ती' (Mental Immunity) वाढवणं.

 

भारतीय ग्रंथ आपल्याला हेच शिकवतात संकट आल्यावर औषध घेण्यापेक्षा, संकट झेलायची ताकद, मनाला आधीच कशी द्यायची ते!

 

समस्या ग्रंथ (तज्ज्ञ) काय मिळतं?
भविष्याची चिंता / ताण भगवद्गीता "फळाची आशा न धरता कर्म करणं" चिंतामुक्ती.
लोकसंग्रह / व्यवहार दासबोध "व्यावहारिक शहाणपण" (Practical Wisdom)- सोशल इंटेलिजन्स.
अस्वस्थता / द्वेष ज्ञानेश्वरी "विश्वबंधुत्वाची भावना" मनाची विशालता.
शिस्त / एकाग्रता मनाचे श्लोक "मनावर ताबा मिळवण्याचे तंत्र" डिसिप्लिन.
ओळख विसरणे / ओझं वाटणे (Identity Crisis) सांख्य दर्शन / योग स्व' आणि 'समस्या' वेगळी करण्याची दृष्टी.

 

भारतीय ग्रंथ हे म्हातारपणीच्या पारायणासाठी नाहीत, तर ते तरुणपणीच्या 'परफॉर्मन्स' साठी आहेत. ही आपली 'Core Philosophy' आहे, जी आपल्याला जगात पाय रोवून उभा राहायला शिकवते.

 

 

माझ्या वैयक्तिक अनुभवातील माईंड जिम प्रॅक्टिसेस (The Practical Experiment):

१. एक विचार (Insight): आज ग्रंथाला 'धार्मिक पुस्तक' म्हणून न बघता, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक 'तज्ज्ञ मित्र' म्हणून बघा.

 

२. एक कृती (Small Step): तुमच्या आयुष्यात सध्या जो काही प्रश्न तुम्हाला सतावतोय, तो एका कागदावर लिहा. मग कोणताही एक ग्रंथ उघडा (उदा. दासबोध किंवा गीता) आणि त्यातील एखादं पान वाचून बघा. तुम्हाला आश्चर्याने पटेल की, तिथे तुमच्या प्रश्नाशी संबंधित काहीतरी नक्कीच मिळेल.

 

३. एक साधना (The Mind Reset): वाचन साधना (१० मिनिटे): रोज १० मिनिटे कोणत्याही ग्रंथाचे वाचन करा. वाचन करताना केवळ डोळ्यांनी वाचू नका, तर ते शब्द तुमच्या मनात उतरू द्या.

 

भारतीय ग्रंथ आपल्याला 'मनाची रोगप्रतिकारक शक्ती' (Mental Immunity) वाढवायला शिकवतात. जसं आपण थंडी-ताप येऊ नये म्हणून 'काढा' पितो, तसंच आयुष्यात मोठे धक्के बसल्यावर मन कोलमडून पडू नये म्हणून आपण रोज गीतेचे किंवा दासबोधाचे डोस घेतले पाहिजेत. यालाच 'Preventive Mental Health' ('मानसिक प्रतिबंधात्मक उपाय') म्हणतात. म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावर उपाय करण्यापेक्षा, प्रॉब्लेमचा आपल्यावर दुष्परिणाम होऊ नये अशी मनाची तयारी करणे.

 


 

निष्कर्ष: गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी आपण वेळ काढतो, कारण गाडी महत्त्वाची असते. पण गाडी चालवणारं 'मन' जास्त महत्त्वाचं नाही का? मग त्याच्या रोजच्या "सर्व्हिसिंग" साठी या ग्रंथांची मदत घ्यायला हरकत काय?

 

तुमच्या घरात असा कोणता ग्रंथ आहे ज्याला तुम्ही अद्याप हातही लावला नाही ? त्याचं नाव कमेंट्समध्ये शेअर करा
आणि हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला अजूनही असं वाटतं का की हे ग्रंथ फक्त म्हातारपणासाठी आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण यावर सविस्तर चर्चा करूया

 

© श्रीपल्लवी
अभ्यासक – भारतीय मानसशास्त्र

Ready for your own mental detox?

Join the program today and start your journey.

Get in Touch